जागतिक स्तरावर “संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम ” (UNDP) मार्फत दरवर्षी डिसेंबर मध्ये त्या वर्षाचा “मानव विकास अहवाल ” जाहीर केला जातो . या अहवालात पुढील पाच निर्देशांकांची गणना केली जाते :
१. मानव विकास निर्देशांक (Human Development Index – HDI)
२. असमानता- समायोजित मानव विकास निर्देशांक (Inequality- adjusted Human Development Index – IHDI)
३. लैंगिक असमानता निर्देशांक (Gender Inequality Index – GII)
४. बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक (Multi-Dimensional Poverty Index – MPI)
५. लैंगिक विकास निर्देशांक (Gender Development Index – GDI)
१. मानव विकास निर्देशांक –
UNDP ने १९९० मध्ये पहिल्यांदा हा अहवाल जाहीर केला . त्यामागील प्रेरणा पाकिस्तानी अर्थशास्त्रज्ञ महबूब-उल-हक़ आणि अमर्त्य सेन यांची होती .
महबूब-उल-हक़ यांना “मानव विकास निर्देशांकाचे जनक” म्हणून ओळखले जाते ..
हा निर्देशांक तीन आयाम आणि त्यांच्याशी संबंधित चार निर्देशाके यांच्यावरून काढला जातो – अ) दीर्घ व आरोग्यमय जीवन – जन्माच्या वेळेचे आयुर्मान ब) ज्ञान – २५ वर्षापेक्षा अधिक वयाच्या प्रौढांची सरासरी शालेय वर्षे आणि १८ वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांची अपेक्षित शालेय वर्षे यांचा गणिती मध्य घेतला जातो . क) चांगले जीवनमान – दरडोई स्थूल राष्ट्रीय उत्पन्न वापरले जाते .
निर्देशांकाचे सूत्र = (प्रत्यक्ष मूल्य – किमान मूल्य) / (महत्तम मूल्य – किमान मूल्य)
या चार निर्देशांकांच्या भूमितीय सरासरीवरून HDI काढला जातो व त्याचे मूल्य ० ते १ दरम्यान व्यक्त केले जाते .
मूल्यानुसार देशांचे चार गट केले जातात – अ) निम्न मानव विकास देश – HDI ० ते ०.५५० दरम्यान ब) मध्यम मानव विकास देश – HDI ०.५५० ते ०.६९९ दरम्यान क) उच्च मानव विकास देश – HDI ०.७०० ते ०.७९९ दरम्यान ड) अत्युच्च मानव विकास देश – HDI ०.८०० पेक्षा जास्त
मानव विकास अहवाल २०१९ नुसार भारताचा क्रमांक १२९ आहे व HDI ०.६४७ (मध्यम मानव विकास देश) आहे .
२. असमानता – समायोजित मानव विकास निर्देशांक –
२०१० च्या अहवालात हा निर्देशांक लागू करण्यात आला. हा निर्देशांक मानव विकास निर्देशांकाप्रमाणेच काढला जातो.
देशात चारही निर्देशांकांच्या बाबतीत पूर्ण समानता असेल तर HDI व IHDI समान येतील. मात्र IHDI चे मूल्य HDI पेक्षा जसेजसे कमी होईल तशी असमानता वाढत जाते .
ही असमानता सामाजिक व्यावर्तन (social exclusion) दाखवते.
२०१९ मध्ये या निर्देशांकात भारताचा क्रमांक ९९ वा होता आणि IHDI ०.४४७ इतका होता.
३. लैंगिक असमानता निर्देशांक –
हा निर्देशांक २०१० च्या अहवालात लागू करण्यात आला, त्यामुळे त्याने १९९५ पासून लागू असलेल्या लिंग – आधारित विकास निर्देशांक (GDI) व लिंग सबलीकरण परिणाम (GEM) यांची जागा घेतली .
या निर्देशांकाला मोजण्यासाठी ३ निकष व ५ आयाम वापरले जातात – अ) जनन आरोग्य – 1. माता मर्त्यता (maternal mortality) 2. किशोरवयीन जन्यता (Adolescent fertility) ब) सबलीकरण – 1. संसदीय प्रतिनिधित्व 2. शैक्षणिक स्तर क) श्रम बाजार
२०१९ च्या अहवालात भारताचा क्रमांक १६२ देशांमध्ये १२२ वा आहे आणि GII ०.५०१ आहे.
४. बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक –
या निर्देशांकाची सुरुवात UNDP आणि Oxfard University यांनी मिळून २०१० मध्ये केली. याने १९९७ पासून लागू असलेल्या मानवी दारिद्र्या निर्देशांकाची (HPI) जागा घेतली.
MPI “अल्पकालिक दारिद्र्य” दर्शवितो.
३ आयाम आणि १० निर्देशके यांच्या सहाय्याने हा निर्देशांक काढला जातो- अ) आरोग्य – 1. पोषण 2. बालमर्त्यता ब) शिक्षण – 1. शालेय वर्षे 2. बालक पटसंख्या क) जीवनमान दर्जा – 1. मालमत्ता 2. वीज 3. पाणी 4. स्वच्छतागृह 5. स्वयंपाकाचे इंधन 6. जमीन
यांवरून दारिद्र्याची तीव्रता आणि गरीब व्यक्तींचे प्रमाण ही दोन मापके काढली जातात, त्यानंतर या मापाकांचा गुणाकार करून MPI काढला जातो .
या निर्देशांकानुसार देशांचे ३ गट केले जातात – अ) २०% ते ३३.३३% अभाव – असुरक्षित गट ब) ३३.३३% ते ५०% अभाव – बहुआयामी गरीब क) ५०% पेक्षा जास्त अभाव – तीव्र बहुआयामी गरीब
५. लैंगिक विकास निर्देशांक –
२०१४ च्या अहवालात पहिल्यांदा प्रकाशित केला गेला .
यासाठी HDI काढण्याचेच आयाम वापरले जातात. त्याआधारे महिलांचा व पुरुषांचा HDI वेगवेगळा काढला जातो. त्यावरून GDI चे सूत्र – महिलांचा HDI / पुरुषांचा HDI .
GDI जर १ पेक्षा जास्त असेल तर महिला मागास आणि १ पेक्षा कमी असेल तर पुरुष मागास ठरतात.
पुरुष व स्त्रिया यांतील विकास समान अपेक्षित असल्यास GDI १ असावा लागतो .