नवोदय विद्यालय प्रवेशाची माहिती || Navoday Vidhyalay admission information राज्यातील नवोदय विद्यालयांमधील प्रवेशासाठीच्या निवड चाचणी परीक्षेसाठी यंदा ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. यासाठी आतापर्यंत ऑफलाइन अर्ज करावे लागत असत. पुढच्या शैक्षणिक वर्षात (२०२२-२३) इयत्ता सहावीच्या वर्गात प्रवेश देण्यासाठी ही निवड चाचणी परीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षेला बसण्यासाठी इच्छुक आणि पात्र विद्यार्थांना येत्या ३० नोव्हेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहेत.
प्रश्न – नवोदय विद्यालयात कोणत्या वर्गात प्रवेश घेता येतो?
राज्यातील नवोदय विद्यालयांमध्ये फक्त सहावीच्या वर्गात प्रवेश घेता येतो. यासाठी इयत्ता पाचवीच्या वर्गात असतानात यासाठीच्या निवड चाचणी परीक्षेला बसावे लागते. या परीक्षेतील गुणांच्या आधारे गुणानुक्रमानुसार हे प्रवेश दिले जातात.
या निवड चाचणी परीक्षेसाठीचे अर्ज केव्हापासून करता येणार आहेत?
या विद्यालयांमधील २०२२-२३ या शैक्षणिक वर्षातील प्रवेशासाठीच्या निवड चाचणी परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्यास २३ सप्टेंबरपासून सुरवात झाली आहे. इच्छुकांना येत्या ३० नोव्हेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहेत.
नवोदय विद्यालयांचे शिक्षण मंडळ (बोर्ड) कोणते असते?
१९८६ च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार नवोदय विद्यालयांची स्थापना केलेली आहे. यानुसार केंद्र सरकारच्या वतीने केंद्रीय नवोदय विद्यालय समिती स्थापन केलेली आहे. या स्वायत्त यंत्रणेच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यांत मुलां-मुलींसाठी निवासी जवाहर नवोदय विद्यालये सुरू केली आहेत. या विद्यालयांमधील विद्यार्थांना दहावी व बारावी परीक्षेसाठी केंद्रीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई बोर्ड) असते.
या विद्यालयांतील शिक्षणाचे माध्यम काय असते?
इयत्ता आठवीपर्यंत मातृभाषा किंवा क्षेत्रीय स्तरावरील भाषेतून हे शिक्षण दिले जाते. त्यानंतर गणित व इंग्रजी हे दोन विषय इंग्रजी भाषेतून आणि सामाजिकशास्त्र हे हिंदी भाषेतून शिकविण्यात येते.
जवाहर नवोदय विद्यालयातील प्रवेशाचा विद्यार्थ्यांना नेमका फायदा काय?
या विद्यालयात प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांचे शिक्षण मोफत पूर्ण होते. या विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना आठवीपर्यंत भोजन, निवास, गणवेश आणि वह्या-पुस्तके मोफत पुरविली जातात. मात्र, नववीपासून पुढे दरमहा प्रत्येकी ६०० रुपये एवढे नाममात्र शुल्क विद्यालय विकास निधी म्हणून आकारले जाते. या नाममात्र शुल्कातून सर्व मुली, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, दिव्यांग आणि दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील विद्यार्थांना वगळले आहे. सरकारी कर्मचारी असलेल्या पालकांकडून दरमहा प्रति विद्यार्थी दीड हजार रुपये विद्यालय विकास निधी शुल्क घेतले जाते.