Learn For Dreams
मराठी व्याकरण निबंधलेखन Marathi vyakaran Nibandhlekhan ‘निबंध’ या शब्दत ‘नि’ म्हणजे नीटनेटके, व्यवस्थित, पद्धतशीर आणि ‘बद्ध’ म्हणजे बांधलेले. ज्या लेखनात एखाद्या विषयाच्या अनुषंगाने आपल्या मनात येणारे विचार, भावना, कल्पना इ. कौशल्याने नीटनेटके बांधलेले असतात
निबंध म्हणजे विचार बांधणे, निबंध म्हणजे आधुनिक गद्य लेखनाचा प्रकार होय. निबंध म्हणजे नियमांनी बद्ध असणारे, नियोजित विचारांचे मुद्देसूद लेखन. निबंध विविध लांबीचे असू शकतात. शाळेमध्ये अगदी १० वाक्यांपासून ते ७०० वाक्यांपर्यंत निबंध लेखन विचारले जाऊ शकते. व्यावहारिक क्षेत्रात हे अगदी ३००० किंवा जास्त शब्दांपर्यंत जाऊ शकते.
निबंध म्हणजे विचारांची गुंफण, विचारांची जुळवाजुळव करणे. जेव्हा आपण एखाद्या विषयावर विचार करतो तेव्हा खूप विविध प्रकारचे विचार आपल्या मनात येतात. काही सकारात्मक तर काही नकारात्मक, ते विस्कळीत असतात. त्यांची मुद्देसूद मांडणी करणे म्हणजेच निबंध लेखन. शालेय निबंध लेखन औपचारिक शिक्षण पद्धतीमध्ये निबंध लेखन हे खूप महत्वाचे साधन आहे.
मराठी निबंध लेखनाचे स्वत:चे असे एक कौशल्य असते. वाचन, लेखन व सरावाच्या माध्यमातून हे कौशल्य विकसित करता येते. निबंध लेखनामुळे आपण आपल्या मनातील विचारांचे, भावनांचे, कल्पनांचे विषयांच्या अनुषंगाने सूत्रबद्ध रीतीने प्रकटीकरण करू शकतो.
निबध्यते अस्मिन इति’. जिच्यामध्ये विषय गुंफला जातो अशी वाङ्मयीन रचना म्हणजे ‘निबंध’. अशी संस्कृतमध्ये निबंधाची व्याख्या केलेली आहे. तसेच निबंध ह्या शब्दाची फोड नि बंध अशी करता येते. त्याचा अर्थ बांधणे, गुंफणे, जुळविणे, एकत्रित करणे असा आहे. आशयाच्या सुसंगत मांडणीस निबंध लेखनात फार महत्त्व आहे. योग्य, अर्थपूर्ण शब्दरचना उपमेय उपमांनी सजलेली सुंदर भाषा निबंधाची रंगत वाढवते.
निबंध लेखनाचे स्वत:चे असे एक विशिष्ट तंत्र आहे.
१. आकर्षक सुरुवात, विषयविवेचन व निबंधाचा योग्य समारोप ही निबंध लेखनाची महत्त्वाची अंगे आहेत.
२. निबंध विषयाशी सुसंगत असे काही सुविचार, काव्यपंक्ती, सुभाषिते किंवा एखाद्या घटना प्रसंगाने निबंधाची आकर्षक सुरुवात करता येते.
३. विषय विवेचन करताना त्यात विचारांचा मुद्देसूदपणा आवश्यक आहे.
४. योग्य उदाहरणे, दाखल्यांच्या आधाराने मुद्दा अधिकाधिक प्रभावीपणे स्पष्ट करावा.
५. शेवटी निबंध लेखनाचा समारोप हा सुद्धा परिणामकारक असावा.
६. संपूर्ण निबंधात आपण मांडलेले विचार वाचकांना विचारप्रवण करणारे असावेत
निबंधाची सुरुवात विषय लक्षात घेऊन आकर्षक करावी. त्या विषयाची व्याख्या देऊन, एखाद्या कवितेच्या ओळी देऊन, एखादा प्रसंग सांगून, एखादी वर्तमानपत्रातील बातमी सांगून, एखादी म्हण, सुविचार किंवा वाक्प्रचार सांगून, एखादी गोष्ट सांगून किंवा एखादा संवाद थोडक्यात देऊन निबंधाची सुरुवात करता येईल. निबंधातील आकर्षक सुरुवातीमुळे तुम्ही वाचकाला निबंध वाचण्यास प्रवृत्त केले पाहिजे.
मराठी निबंधाचा मध्यभागः
निबंधाचा मध्यभाग म्हणजे तुमचा खरा निबंध, जिथे निबंधाचा मूळ विचार स्पष्ट होत असतो. निबंधाच्या विषयाचा गाभा इथे दिसला पाहिजे. अनावश्यक बाबी टाळून मूळ विषय मांडावा. वेगवेगळी विशेषणे, क्रियापदे वापरून तीच तीच वाक्ये पुन्हा येणार नाहीत याची काळजी घ्यावी. प्रत्येक मुद्दा नवीन परिच्छेदात मांडावा. मुद्याला अनुसरून उदाहरणे, प्रसंग लिहावेत.
निबंधाचा शेवटः
मराठी निबंधाचा शेवट हा वाचकाच्या स्मरणात रहात असतो, म्हणूनच निबंधाची आकर्षक सुरुवात लक्षात घेऊन शेवटही आकर्षक व परिणामकारक करावा. यात आपण संपूर्ण निबंधात मांडलेले विचार, आपले म्हणणे वाचकाला विचार करायला लावणारे असावे. आपल्या पूर्ण निबंधातील मुद्दे, विचार यांचे सार त्यात असावे, जेणेकरून वाचकाला संपूर्ण निबंध त्या शेवटच्या परिच्छेदात आठवेल. आपले विचार अत्यंत स्पष्टपणे मांडण्याचे कसब आपल्याकडे असायला हवे.
१. वैचारिक निबंध
२. कल्पनारम्य निबंध
३. वर्णनात्मक निबंध
४. आत्मवृत्तात्मक निबंध
१. वैचारिक निबंध :
वैचारिक निबंधात विचाराला महत्त्व असते. दिलेल्या विषयास अनुसरून आपल्याला आपले विचार मांडणे इथे अपेक्षित असते. विचार मांडताना सुद्धा त्यांची मांडणी सुसंगत असावी. त्यासाठी आवश्यक तेथे समर्पक उदाहरणे, शास्त्रीय दृष्टिकोन, संदर्भाचाही वापर करावा. विषयाच्या सर्व पैलूंची म्हणजे सकारात्मक व नकारात्मक मुद्द्यांची मांडणी करावी. विचारांची अशी खंडण-मंडनात्मक मांडणी करून शेवटी निष्कर्षाप्रत यावे.
२. कल्पनारम्य निबंध :
जी गोष्ट वास्तवात मिळत नाही किंवा जर ती मिळाली तर काय होईल, याची कल्पना करून ती शब्दांत मांडणे म्हणजे ‘कल्पनारम्य निबंध’ होय. इथे कल्पना विस्ताराला भरपूर वाव असला तरी कल्पनेचा विस्तार मुद्देसूदपणे करून त्यात सुसंगती ठेवत निबंधाचा समारोप करताना कल्पनेतून बाहेर येणे महत्त्वाचे असते.
३. वर्णनात्मक निबंध :
आपण पाहिलेल्या एखाद्या घटनेचे, व्यक्तीचे, वास्तूचे किंवा प्रसंगाचे चित्र हुबेहूब शब्दांत रेखाटणे म्हणजे वर्णनात्मक निबंध’ होय. या निबंध प्रकारात घटना, व्यक्ती, वास्तूचे केवळ बाह्यात्कारी वर्णन अपेक्षित नसते तर सूक्ष्म निरीक्षण शक्तीच्या आधारे ती घटना, व्यक्ती, वास्तू इ. चे चित्र डोळ्यासमोर उभे राहिले पाहिजे, असे ते वर्णन सहज व सोप्या भाषेत असणे आवश्यक असते.
४. आत्मवृत्तात्मक निबंध :
कल्पना, विचार आणि भावना या तिन्हींची सांगड घालून प्रथम पुरुषी भाषेत, स्वत:विषयी लेखन करणे म्हणजे ‘आत्मवृत्तात्मक निबंध’ होय. या निबंधात व्यक्ती, वस्तू, स्थान इत्यादि घटकांच्या अंतरंगात डोकावणे व त्या अनुषंगाने त्यांच्या सुख-दुःखाशी, अनुभवांशी एकरूप होऊन लेखन करणे महत्त्वाचे असते. मनोगत, कैफियत, कहाणी, आत्मकथन अशीही नावे ह्या निबंध प्रकारास योजली जातात.