Learn For Dreams
भारतीय कंपनी करणार चंद्रावर स्वारी Indian Company to Invade the Moon
अवकाश तंत्रज्ञानाच्या स्पर्धेमध्ये आता खासगी क्षेत्रानेही उडी घेतली असून, या चढाओढीमध्ये ‘टीमइंडस’ या भारतीय कंपनीनेही आपले आव्हान निर्माण केले आहे.
चंद्रावर रोव्हर सोडण्यासाठी होत असलेल्या स्पर्धेमध्ये ही कंपनी सहभागी होत असून, भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो) सहकार्याने या प्रकल्पावर काम करण्यात येत आहे.
चंद्रावर यान सोडण्याबरोबरच अवकाश तंत्रज्ञानामध्ये खासगी क्षेत्राचा सहभाग वाढावा आणि या तंत्रज्ञानामागील खर्च कमी व्हावा, यासाठी ‘गुगल’ने ‘लुनार एक्स’ ही स्पर्धा जाहीर केली आहे. तीन कोटी डॉलरच्या या स्पर्धेमध्ये ३० कंपन्यांची नावे निश्चित करण्यात आली असून, त्यातील १६ कंपन्या स्पर्धेत आहेत.
या १६पैकी चारच कंपन्यांनी प्रक्षेपणाचे करार अंतिम केले आहेत. यामध्ये दोन अमेरिकी आणि एक इस्रायली कंपनीचा समावेश आहे.
या स्पर्धेमध्ये सहभागी होणारे रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर किमान ५०० मीटर अंतरापर्यंत प्रवास करावे आणि तेथील माहिती संकलित करावी, अशी अपेक्षा आहे.
तसेच, या मोहिमेच्या खर्चापैकी ९० टक्के वाटा खासगी क्षेत्रातून यायला हवा. हे प्रक्षेपण पुढील वर्षी करण्यात येणार आहे. या मोहिमेसाठी ‘टीमइंडस’ ‘इस्रो’च्या ‘अँट्रिक्स’ या व्यावसायिक शाखेबरोबर काम करणार आहे.
या मोहिमेसाठी कार्यक्षम असणारे मॉडेल सादर केल्याबद्दल ‘गुगल’ने २०१४मध्ये या कंपनीला १० लाख डॉलरचे बक्षीस दिले होते. या मोहिमेविषयी ‘टीमइंडस’चे प्रमुख राहुल नारायण म्हणाले,
‘अवकाश संशोधनाच्या क्षेत्रामध्ये ‘इस्रो’ने अनेक दशकांच्या कामातून ठसा उमटविला आहे आणि या वारशाची मदत आम्हाला मिळणार आहे.
आमच्यातील करारामुळे, पुन्हा एकदा ही खरेखुरी भारतीय मोहीम असून, भारतातील खासगी आणि सरकारी क्षेत्राचे एक समान स्वप्न आहे, हेच दाखवून द्यायचे आहे.’
पुढील वर्षी मोहीम ‘टीमइंडस’च्या नियोजनानुसार, २८ डिसेंबर २०१७ रोजी या रोव्हरचे प्रक्षेपण करण्यात येणार आहे. त्या आधी तीन वेळा प्रायोगिक प्रक्षेपण होईल. हे रोव्हर २८ जानेवारी २०१८ रोजी चंद्राच्या वायव्य भागातील पृष्ठभागावर पोहोचेल, असा अंदाज आहे. हे रोव्हर तिरंगा ध्वज घेऊन जाणार आहे.
या मोहिमेसाठी ‘इस्रो’बरोबर सखोल काम करण्यात येत आहे. मात्र, या मोहिमेवर अंतिम नियंत्रण ‘टीमइंडस’चेच असेल.
उद्योजकांचाही हात चंद्रावर रोव्हर पाठविण्याच्या या मोहिमेसाठी सहा कोटी डॉलरपर्यंत खर्च येणार आहे. यासाठी १०० जणांचा चमू कार्यरत आहे. यामध्ये ‘इस्रो’तील २० निवृत्त शास्त्रज्ञही आहेत. अनेक उद्योजकांनी या मोहिमेसाठी हात दिला असून, यामध्ये रतन टाटा यांचाही समावेश आहे.
चंद्राच्या पृष्ठभागावर रोव्हर उतरविणे खूपच आव्हानात्मक आहे, याची आम्हाला जाणीव आहे. मात्र, रोव्हरची रचना, विश्लेषण आणि अन्य बाबतींमध्ये आमचा ९० टक्के विश्वास आहे. तर, रोव्हर चंद्रावर उतरविण्याविषयी ७५ टक्के विश्वास आहे.
युरोपीय अवकाश संस्थेचे मंगळावर उतरणारे रोव्हर काही महिन्यांपूर्वी कोसळले. त्यामुळे, त्यांची मोठे नुकसान झाले आहे. अन्य प्रतिस्पर्ध्यांची तुलना करता,
‘इस्रो’बरोबर असण्याचा आम्हाला फायदा आहे.
सर्व विषयाचे सराव प्रश्नसंच डाउनलोड करा
Mpsc मोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज Join Now