कॅल्शियमची वनस्पतीच्या शरीरांतर्गत कार्ये
१) पेशी मजबूत ठेवणे – पेशी भित्तिका (सेल वॉल) मजबूत ठेवण्यासाठी कॅल्शियम मदत करते. कॅल्शियममुळे पेशी भित्तिका मजबूत व जाड बनतात. पेशीमध्ये पेक्टिन व पॉलिसॅकराइड आधारक तयार होण्यासाठी कॅल्शियमची जरुरी असते. या घटकांमुळे पेशींना मजबुती येते. पिकांच्या पेशी, उती व अवयवांची लवकर वाढ व मजबुती कॅल्शियममुळेच मिळते.
२) फूल व फळधारणा – पिकांमध्ये फूल, फळधारणाक्षमता वाढविण्यासाठी कॅल्शियम मदत करते.
३) पिकांची प्रत – पिकांची प्रत उत्तम राहण्यास व उत्पादन अधिक काळ टिकून राहण्यास कॅल्शियम मदत करते.
४) उष्णतेपासून पिकांचे संरक्षण – पिकांमध्ये सर्वांत महत्त्वाची वातावरणातील प्रकाश संश्लेशण क्रिया असते. वातावरणातील तापमान जर ३५ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक झाल्यास प्रकाश संश्लेषण क्रिया मंदावते. अति उष्णतेमुळे झाडांचे खोड लांब होते, तर पानांचा आकार लहान होतो. या सर्व घटकांशी लढा देण्यासाठी पिकांना कॅल्शियम गरजेचे असते. कॅल्शियममुळे पिकामध्ये उष्माघातविरोधी प्रथिने तयार केली जातात.
५) रोगप्रतिकारक क्षमता – कॅल्शियम पिकांमध्ये बुरशीजन्य व जिवाणुजन्य रोगाविरुद्ध रोगप्रतिकारक क्षमता वाढवते. पिकांमध्ये कॅल्शियमची कमतरता असल्यास, बुरशींचा प्रादुर्भाव होऊन पाणीवहन करणाऱ्या नलिकेवर (xylem) विपरीत परिणाम होतो. पेशीभित्तिकांना पाणी व अन्नपुरवठा करणाऱ्या अवयवांची झीज होऊन मर रोगाची लक्षणे पिकांत दिसून येतात.
– भुईमूग पिकाला कॅल्शियमची योग्य मात्रा दिली असता शेंगकूज रोग उद्भवत नाही. तसेच शेंगा चांगल्या भरल्या जातात.
– कॅल्शियममुळे फळ पिके, भाजीपाला पिके यांचाही बुरशीजन्य व जिवाणुजन्य रोगांपासून बचाव होतो. पिथियम, रायझोक्टोनिया, फ्युजारियम, कोलोट्रोटिकम, बोट्राइटीस, ब्लाइट, स्लेटोटिनिया, हैलमिथेस्पारियम यासारख्या रोगापासून संरक्षण मिळण्यास मदत होते.
६) अन्नद्रव्याचे शोषण – अन्नद्रव्ये शोषण करणाऱ्या प्रथिनांच्या कार्यात कॅल्शियम महत्त्वाची भूमिका बजावते, त्यामुळे अन्नद्रव्यांचे मुळांद्वारा शोषण होऊन पिकांच्या प्रत्येक भागाला अन्नद्रव्यांचा पुरवठा होतो. कॅल्शियम नायट्रेट किंवा कॅल्शियम अमोनियम नायट्रेट पाण्यात सहज विरघळत असल्याने पाण्याद्वारा व ठिबक सिंचनाद्वारा दिल्यास फायदा होतो.
७) भूसूधारक – कॅल्शियमचा वापर भूसुधारकांमध्येही होतो. कॅल्शियमयुक्त खतांचा वापर जमिनीची आम्लता कमी करण्यासाठी आणि मातीची जडणघडण चांगली राखण्यासाठी केला जातो.
– जमिनींची आम्लता कमी करण्यासाठी चुना (कॅल्शियम कार्बोनेट) कणांचा आकार ०.२५ मि.मी. पेक्षा अधिक (जाड, भरड) असल्यास अधिक फायदेशीर ठरते.
– तसेच अाम्लधर्नी जमिनीत फळपिकांची लागवड करावयाची झाल्यास लागवड करायच्या आधी ७ ते ८ महिने चुन्याचा वापर करणे फायदेशीर ठरतो.
– तसेच हिवाळ्यात जर चुना मातीत मिसळला तर ते जमिनीच्या आरोग्याच्या दृष्टीने अधिक फायदेशीर ठरते.
चोपण जमिनीमध्ये सुधारणा करण्यासाठी जिप्सम (कॅल्शिअम सल्फेट) साधारणतः ५-१० टन प्रति हेक्टर याप्रमाणे जमिनीत टाकले जाते. त्यामुळे मातीच्या कणांवरील सोडियम दूर होऊन जमिनीच्या जडणघडणीत सुधारणा होते. सामू कमी होतो व मुळांची चांगली वाढ होते. अन्नद्रव्यांचे शोषण अधिक चांगल्या प्रकारे होते.
वरील विशेष कार्याव्यतिरिक्त कॅल्शियम खालील कार्य करते –
कॅल्शिअम पिकांच्या मुळांची व पिकांची वाढ लवकर करण्यास मदत करते. कॅल्शियममुळे नत्र, लोह, बोरॉन, जस्त, तांबे आणि मँगेनिजचे पिकांमध्ये शोषण वाढवले जाते.
कॅल्शियममुळे पिकांच्या गुणसूत्रांना स्थिरता येते. कॅल्शियममुळे पिकांमध्ये शर्करेचे वहन चांगले होण्यास मदत होते. कॅल्शियममुळे बीजोत्पादन चांगले होते.
पिकांच्या शेंड्याकडील वाढ, कळ्या आणि मुळांची वाढ खुंटते.
याची लक्षणे पिकांच्या शेंड्याकडे प्रथम दिसतात. कारण पिकांमध्ये कॅल्शियमचे नत्राप्रमाणे वहन होत नाही.
पिकांची वाढ कमी होते, तसेच बीजोत्पादनात घट येते.
पिकांच्या पानांच्या कडा करपणे, पिवळे डाग पडणे, टोके जळणे इत्यादी लक्षणे दिसून येतात.
पिकांच्या फळ, फुले व टोकाकडील भागाचा आकार लहान होतो. फूल व फळांची गळती होते व टोके जळतात.
मका पिकात कॅल्शियमच्या कमतरतेमुळे नवीन पाने चिकटतात, पानांची वाढ चांगली होत नाही, तसेच नवीन पाने गुंडाळतात.
टोमॅटो पिकाला फळांच्या वरच्या भागापासून तडा जातो व नंतर फळे काळी पडतात.
भुईमूग या पिकात शेंगा पोकळ व लहान बनतात. शेंगांच्या आतून काळा पदार्थ निघतो. शेंगबिया व्यवस्थित भरत नाहीत.
गाजर फळांवर खवले पडतात. गाजरे डागाळतात.
बटाटा पिकात कॅल्शिअमच्या कमतरतेमुळे फळांच्या आतला भाग लालसर तपकिरी किंवा काळा होतो, तसेच स
ाठवण क्षमता कमी होते.
कोबीच्या आतील पानांच्या कडा जळतात. पाने कुजतात.
फळांची प्रत कमी होते व फळे लवकर खराब होतात.
१) जमिनीचा प्रकार – भरड्या व रेताड जमिनीत कॅल्शियमची कमतरता चिकणमाती किंवा पोयटायुक्त जमिनीपेक्षा जास्त असते. काळ्या जमिनीत इतर जमिनीच्या तुलनेत कॅल्शियम जास्त असते.
२) जमिनीचा सामू – आल्मधर्मी (सामू ६ पेक्षा कमी) असलेल्या जमिनीत ॲल्युमिनियमचे प्रमाण अधिक असते. परिणामी, कॅल्शियमची कमतरता निर्माण होते. तसेच अल्कधर्मी (सामू ८.५ पेक्षा अधिक) असलेल्या जमिनीत सोडियमचे प्रमाण अधिक असल्यामुळे कॅल्शियमची कमतरता निर्माण होते.
३) सेंद्रिय घटक – सेंद्रिय घटकांचे प्रमाण कमी असलेल्या जमिनीत कॅल्शियम मातीच्या कणांना चिकटून राहत नाही. त्याचे वहन होते.
४) कॅल्शियम व अन्य धनप्रभारित अन्नद्रव्यांचे गुणोत्तर ०.१०-०.२० इतके असेल तर हे पिकांसाठी चांगले व फायदेशीर असते. जमिनीत जर अमोनियम (NH4+), पोटॅशियम (K+), मॅग्नेशियम (Mg2+) आणि ॲल्युमिनियम (Al3+) चे प्रमाण अधिक असेल तर कॅल्शियमची जमिनीत व पर्यायाने पिकांमध्ये कमतरता निर्माण होते.
– अधिक पाऊस आणि अधिक सिंचन दिल्याने जमिनीतून कॅल्शियमचा ऱ्हास होतो.
– हलक्या जमिनी, आम्लयुक्त खतांच्या वापरामुळेही कॅल्शियमचा ऱ्हास होतो.
जमिनीत कॅल्शियम योग्य राखण्यासाठी उपाय –
१) सेंद्रिय घटकांचा वापर हलक्या व रेताड जमिनीत करावा.
२) कॅल्शियमयुक्त खतांचा वापर नायट्रेट नत्र असलेल्या खतांसोबत करावा. त्यामुळे दोन्हींचा कार्यक्षम वापर होतो.
३) आल्मधर्मी जमिनीत चुना आणि चोपण जमिनीत जिप्समचा वापर करावा. जमिनीची भौतिक, रासायनिक व जैविक स्थिती चांगली राहण्यास मदत होते.
अ. क्र. —- स्रोत —- प्रमाण
१ —- सिंगल सुपर फॉस्फेट —- १८-२१ टक्के
२ —- ट्रिपल सुपर फॉस्फेट —- १२-१४ टक्के
३ —- कॅल्शियम नायट्रेट —- १५ ते १९ टक्के
४ —- जिप्सम —- १८ ते २२ टक्के
५ —- डोलोमाइट चुना —- २२ टक्के
६ —- चुना (CaCO3) —- ४० टक्के
७ —- कॅल्शियम अमोनियम नायट्रेट —- १५ टक्के
– फवारणीद्वारा कॅल्शियम पिकांना दिल्यास पिकांद्वारा लवकर शोषला जातो. शेंड्याकडील भागांना कॅल्शियम लवकर व मुबलक प्रमाणात उपलब्ध होतो व पिकांची वाढ व पोषण चांगल्या प्रकारे होते.
– तसेच नत्रयुक्त खतासोबत कॅल्शियम दिल्यास (फवारणीद्वारा) पिकांची वाढ जोमाने होते.
कॅल्शियमचा इतर अन्नद्रव्यांसोबत परस्परसंबंध –
कॅल्शियम हे धनप्रभारित (Ca++) आयन असल्यामुळे इतर धनभार असलेल्या अन्नद्रव्यांसोबत शोषणासाठी स्पर्धा निर्माण होते. जसे सोडिअम, पोटॅशिअम, मॅग्नेशिअम, अमोनिअम, लोह आणि ॲल्युमिनिअम.
सोडिअम – सोडिअमचे प्रमाण अधिक असलेल्या जमिनीत मातीच्या कणांवरील कॅल्शियम सोडिअममुळे दूर लोटला जातो. परिणामी, कॅल्शियमचे विद्राव्य स्वरूपात जमिनीतून वहन होते व ऱ्हास होतो. सोडिअमचे प्रमाण अधिक झाल्यामुळे पिकांना सोडिअममुळे हानी होते. यामुळेच क्षारयुक्त व चोपण जमिनीत कॅल्शियम (जिप्सम) टाकला जातो.
स्फुरद – जमिनीचा सामू ७ पेक्षा जास्त असेल तर मुक्त चुना मातीमध्ये जमा होतो. अशा स्वरूपातील उपलब्ध कॅल्शियम इतर अन्नद्रव्यांशी रासायनिक क्रिया करतो. स्फुरद ऋणप्रभारित आयन असल्यामुळे मुक्त चुना व स्फुरद यांच्यामध्ये रासायनिक क्रिया होते. पिकांना कॅल्शियम उपलब्ध होऊ शकत नाही. ज्या जमिनीत कॅल्शियमचे प्रमाण जास्त असते, अशा जमिनीत स्फुरदाची उपलब्धता कमी होते.
लोह आणि ॲल्युमिनियम – ज्या जमिनीचा सामू ७.० पेक्षा कमी असतो, अशा जमिनीत लोह आणि ॲल्युमिनियम उपलब्धता जास्त असते. त्यामुळे अशा जमिनीतील कॅल्शियमची उपलब्धता घटते.
बोरॉन – ज्या जमिनीत व पिकांमध्ये कॅल्शियम प्रमाण जास्त असते, अशा जमिनीत पिकांमध्ये बोरॉनची उपलब्धता व शोषण यावरदेखील विपरीत परिणाम होतो. त्यामुळेच बोरॉनची अति उपलब्धता किंवा कमतरता पिकांमध्ये व जमिनीत होऊ नये म्हणून कॅल्शियम फवारणी व जमिनीतून दिल्यास फायदा होतो.
सर्व विषयाचे सराव प्रश्नसंच डाउनलोड करा
Mpsc मोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज Join Now
नवीन सरकारी नोकरी अपडेट्स Visit Now
Calcium functions in the body of the plant